मुंबई, २४ ऑक्टोबर २०२२ : पॅरिसहून १५ कोटींचे अंमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आले. ही खेप पॅरिसहून आली असून ती नालासोपारा परिसरात वितरणा साठी जाणार होती. या कारवाईदरम्यान डीआरआयने तिघांना अटक केली आहे. हा संपूर्ण माल कुरिअर पार्सलच्या रुपात मुंबईत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्सलमध्ये सुमारे १.९ किलो अॅम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ भरण्यात आला होता. माहिती देणाऱ्यांच्या माहितीवरून डीआरआयने ही खेप जप्त केल्यानंतर आता या ड्रग्जच्या जाळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आठवडाभरापूर्वी डीआरआयला माल मुंबईत पोहोचल्याची माहिती मिळाली होती. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय पार्सलमध्ये मुंबईत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या माहितीवरून एएआयच्या टीमने मुंबई विमानतळावर इंटरसेप्टर बसवला. २० ऑक्टोबर रोजी ही खेप मुंबई विमानतळावर उतरताच डीआरआयच्या पथकाने ते ताब्यात घेऊन जप्त केले.
वितरण साखळी अंतर्गत पुरवठा केला जाणार होता
संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि नियोजनबद्ध आखणी करत, हे पार्सल एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे गुप्तपणे पोहोचवले गेले, याचा छडा लावला. जेव्हा हे पार्सल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवले जाणार होते, त्यावेळी, या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या मार्फत, या तस्करीत सामील असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं. या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल एका नायजेरियन व्यक्तीला दिलं जाणार होतं. ही माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी सापळा रचून, पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीलाही ताब्यात घेतलं, अशाप्रकारे या तस्करीप्रकरणी, पोलिसांनी आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड