पुणे, २५ ऑक्टोंबर २०२२: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनून इतिहास रचलाय. यूके सरकारमध्ये सर्वोच्च पद भूषवणारे ऋषी सुनक हे पहिले भारतीय वंशाचे आहेत. टोरी नेतृत्वाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डंट यांना मागं टाकून पंतप्रधानपदाची खुर्ची विराजमान केलीय.
ऋषी सुनक यांना १८० हून अधिक कंझर्व्हेटिव्ह खासदारांचा पाठिंबा होता, तर पेनी समर्थनाच्या बाबतीत खूपच मागं होत्या. त्यानंतर पेनी यांनी त्यांचं नाव मागं घेतलं आणि ऋषी सुनक यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
कोण आहेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक
ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० रोजी साउथम्प्टन, यूके येथे झाला. ऋषी यांचे वडील डॉक्टर होते आणि आई दवाखाना चालवत होत्या. ऋषी सुनक यांना तीन बहिणी आणि भाऊ असून त्यात ते सर्वात मोठे आहेत. ऋषी सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटिश काळातील पंजाब प्रांतात झाला, तर ऋषी सुनक यांच्या वडिलांचा जन्म केनियामध्ये आणि आईचा जन्म टांझानियामध्ये झाला.
ऋषी सुनक यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचा अभ्यास केला, त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतलं. ऋषी सुनक यांनी ऑक्सफर्डमध्ये तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. यानंतर ऋषी सुनक यांनी स्टॅनफोर्डमधून एमबीएही केलं. या काळात ते विद्यापीठात विद्वान होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ऋषी सुनक यांनी गोल्डमन सॅक्समध्ये काम केलं आणि नंतर हेज फंड फर्ममध्ये भागीदार बनले.
त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा ऋषींनी राजकारणात प्रवेश केला नव्हता, तेव्हा त्यांनी एक अब्ज पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटनमधील लघुउद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी ही कंपनी खूप उपयुक्त होती.
ऋषी सुनक यांचं राजकीय पदार्पण
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक, २०१५ मध्ये प्रथमच यूके संसदेत पोहोचले. यॉर्कशायरमधील रिचमंडमधून ऋषी सुनक विजयी झाले. ऋषी सुनक हे ब्रेक्झिटला पाठिंबा देणार्या नेत्यांपैकी एक होते, त्यामुळं राजकारणात त्यांचा दर्जा झपाट्यानं वाढत गेला.
ऋषी सुनक यांनी माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्रीपदही भूषवलंय. यानंतर २०१९ मध्ये ऋषी सुनक यांनी बोरिस सरकार मध्येही ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ऋषी सुनक यांचे सासरे
ऋषी सुनक हे ब्रिटनच्या अशा नेत्यांमध्ये गणले जातात ज्यांची सासरवाडी देखील बलाढ्य श्रीमंत आहे. वास्तविक ऋषी सुनक यांचं लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झालंय. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. पुढं दोघांनी लग्न केलं. ऋषी आणि अक्षता यांना दोन मुलीही आहेत, ज्यांची नावं कृष्णा आणि अनुष्का आहेत.
कोरोनाच्या काळात प्रभावी काम
ऋषी सुनक हे बोरिस सरकारमधील अतिशय लोकप्रिय मंत्री होते. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की जेव्हा जेव्हा सरकारची पत्रकार परिषद होते तेव्हा ते अनेकदा चेहरा म्हणून पाहिले जात होते. कोरोनाच्या काळात यूकेची आर्थिक स्थिती चांगली ठेवल्याबद्दल ऋषी सुनक यांचंही कौतुक होत आहे.
ऋषींच्या मेहनतीचं फळ म्हणजे कोरोनाच्या काळातही सर्व वर्गातील लोक त्यांच्या कामावर पूर्णपणे खूश होते. कोरोनाच्या काळातच ऋषी सुनक यांच्या धोरणांमुळं लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला नाही, ज्याचा फायदाही अनेकांना झाला आणि ऋषी लोकांमध्ये लोकप्रिय बनले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे