नवी दिल्ली, २६ ऑक्टोंबर २०२२ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला आवाहन करत भारतीय चलनावर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या या मागणीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले
केंद्र सरकार आणि केजरीवाल दोघे मिळून देशाला फसवत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
आपल्याला माहिती आहे, की देशाचा रुपया संपायला आलेला आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने रुपयांची घसरण सुरू आहे, ती वाचवणं गरजेचं आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे. ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र, मतांच्या राजकारणासाठी यापद्धतीने मागणी करत धार्मीक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासियांची फसवणूक करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने आम आदमी पार्टीचे वर्णन भाजप आणि आरएसएसची बी टीम असे केले आहे. संदीप दीक्षित म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना काही समज नाही. हे त्यांचे मतांचे राजकारण आहे. जर तो पाकिस्तानात गेला तर तो असेही म्हणू शकतो की मी पाकिस्तानी आहे, त्यामुळे मला मत द्या.असेही केजरीवाल बोलतील असे संदीप दीक्षित म्हणाले.
मनोज तिवारी
तसेच केजरीवाल यांच्या विधानं वर भाजप नेते मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. केजरीवाल यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी मतांसाठी धर्माचा आव आणत असल्याचं म्हटलंय. तसेच तिवारी यांनी केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबमधील जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा
तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, केजरीवालांचे राजकारण आता यू-टर्न घेत आहे. तसेच हा तोच माणूस आहे ज्याने अयोध्येतील राम मंदिरात जाण्यास नकार दिला होता आणि दावा केला होता की भगवान तेथे केलेल्या प्रार्थना स्वीकारणार नाहीत. एवढेच नाही तर काश्मिरी पंडित खोटे बोलतात असेही संबित पात्रा म्हणाले.
नक्की काय म्हणाले अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. “दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला असून अनेकांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत.
तसेच केजरीवाल पुढं म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत समृद्ध देश व्हावा, लोकांनी श्रीमंत व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पावलं उचलावी लागतील. आपल्याला रुग्णालये बांधावी लागतील, मोठ्या प्रमाणात शाळा उघडाव्या लागतील. पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. यासाठी देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आमचे प्रयत्न यशस्वी होतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट मत सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे