अलिबाग, २८ ऑक्टोबर २०२२: अलिबाग ते वडखळ महामार्गाच्या दुपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या खड्ड्यामुळे हैराण असलेल्या पर्यटक आणि अलिबागकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अलिबाग ते वडखळ या २२.२ कि.मी लांबीच्या रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०२२-२३ अंतर्गत पेवड शोल्डरसह दुपदरी करण्याचे काम आणि काँक्रीटकरण मंजुर करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांना या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत.
अलिबाग शहराला जोडणाऱ्या या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय आणि पर्यटनस्थळ असल्याने अलिबागला दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. या शिवाय धरमतर येथील जेएसडब्ल्यू प्रकल्प पीएनपी पोर्टमधून अवजड वाहतूक होत असते. या मंजुरीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर