टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये आज रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सेमीफायनल सामना

पुणे, १० नोव्हेंबर २०२२ : टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२२ चा दुसरा सेमी फायनलचा सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात एडिलेट ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. काल विश्वचषकाचा पहिला सेमी फायनलचा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झाला. या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला. त्यामुळं आज जो संघ हा सामना जिंकेल तो फायनल मध्ये पाकिस्तान सोबत खेळणार आहे.

टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये आज टीम इंडिया चौथ्यांदा इंग्लंडशी भिडणार आहे. या अगोदर २००७ मध्ये दोन्ही संघ प्रथमच आमने-सामने आले होते. त्यानंतर २००९ मध्ये दुसऱ्यांदा लॉर्ड्स च्या मैदानावर आणि २०१२ मध्ये श्रीलंकेत आमने सामने आले होते. त्यानंतर १० वर्षा नंतर आज पुन्हा एकदा विश्वचषकात भिडणार आहेत.

भारतानं आतापर्यंत विश्वचषक २०२२ च्या प्रवासामध्ये पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. यामध्ये ३ सामन्यांत टीम इंडियाची सेम प्लेइंग इलेव्हन होती. फक्त दोन सामन्यांमध्ये त्यात बदल केला होता. त्यामुळं आजच्या सामन्यांत सुद्धा भारतीय संघात एक बदल केला जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने तसे याचे संकेत सुद्धा दिले आहेत.

या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने केल्या आहेत. हे दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. विराट ने या वर्ल्डकप मध्ये पाच सामन्यांमध्ये २४७ धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवनं २२५ धावा केल्या आहेत.

दरम्यान आजच्या सेमी फायनल ची सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण काल पाकिस्तानने उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. त्यामुळं आता भारतानं आज चा सामना जिंकला तर फायनल मध्ये जोरदार रंगत येऊ शकते. त्यामुळं भारत आजचा सामना जिंकतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असंल. दरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता एडिलेटच्या ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा