डिव्हाईन केमिकल कंपनीतील स्फोटात आतापर्यंत पाच जखमी कामगारांचा मृत्यू

खेड (जि. रत्नागिरी), २३ नोव्हेंबर २०२२ : खेड तालुक्यातील लोटे येथील डिव्हाईन केमिकल्स कंपनीमधील स्फोटामध्ये भाजलेल्या आठ कामगारांपैकी आतापर्यंत पाच कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील अन्य तीन जखमी कामगारांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

डिव्हाईन केमिकल कंपनीमध्ये रविवारी १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोट दुर्घटनेत एकूण आठ कामगार होरपळले होते. त्यापैकी गेल्या ८ दिवसांत आशिष रामलखन मौर्या, विनय मौर्य, विपल्य मंडळ, संदीप कुमार, परवेज सावा ऊर्फ गुप्ता या पाच कामगारांचा मुंबई येथील ऐरोली नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना एकापाठोपाठ एक असा मृत्यू झाला, तर आगीत होरपळलेल्या मयूर काशिराम खाके, दीपक गंगाराम महाडिक व सतीशचंद्र मौर्य यांच्यावर अजूनही मुंबई ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पाच कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या दुर्घटनेबाबत अनेक गंभीर विषय समोर येत असून, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कसलीही उपाययोजना या कंपनीत अमलात येत नसल्याचे आरोप होत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राकेश कोळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा