वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग), २४ नोव्हेंबर २०२२ : कोकणाशी कोल्हापूर जोडणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कणकवली-तळेरे-वैभववाडी-करुळ घाट-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर दीड ते दोन फुटांपर्यंत खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतूकदारांनाही या महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर उस वाहतूक वाढली आहे. यामुळे या मार्गांवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. खड्ड्यात पडून अनेक उसाचे ट्रॅक्टर उलटले आहेत. आतापर्यंत या महामार्गावरून पंचवीस ते तीस जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही प्रशासनाला जाग आली नाही.
कणकवलीपासून तळेरे बसस्थानकापर्यंत तर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळतात. तेथून कोल्हापूर शहरापर्यंत जवळपास शंभर किमीच्या रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था दिसते.
कोकणातून कोल्हापूरमार्गे मुंबईला जाण्यासाठी अनेकजण
मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करतात; परंतु मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. विविध ठिकाणी घाट खचणे, साईड पट्ट्यांची दुरवस्था, मोठाले खड्डे, पावसाच्या पाण्यात रस्ते वाहून जाणे, असे विविध प्रकार घडत असल्याने या मार्गांवरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
एकंदरीत कोकणातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मालवण तालुक्याचा विविध भाग, कुडाळ तालुक्यातील अंतर्गत रस्ते, कणकवली- तळेरे ते वैभववाडी मार्ग, कणकवली तालुक्यातील कनेडी, नाटळ, सांगवे मार्गावर, फोंडा मार्गावर, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, दाणोली, आंबोली मार्गावर, दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भाग असे सर्वच ग्रामीण भागातील रस्ते उखडून गेले आहेत.
घाटरस्ते बेभरवशी
आंबोली, गगनबावडा (करूळ) किवा फोंडा या तिन्ही घाटमार्गांवरील रस्ते बेभरवशी आहेत. या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका तर आहेच; परंतु या घाटरस्त्यांना जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात खड्ड्यांमुळे रस्ताच गायब झाला आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते’ अशी स्थिती घाटरस्त्यांची झालेली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील
मस्तच