रत्नागिरी, २८ नोव्हेंबर २०२२ : शहरालगतच्या नाचणे गावातील कन्या अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नाचणे पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुक्यातून अनुयाचे अभिनंदन होत आहे.
नाचणे गावात अनुया हिच्या वडिलांचा वेल्डींगचा व्यवसाय आहे. दिलीप करंबेळकर अस त्यांचं नाव. त्यांनी मुलीलाही व्यवसायात रुची असल्यामुळे माहिती दिली होती. याच आवडीमुळे अनुयाने शिर्के हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एमसीव्हीसी’मधून (इलेक्ट्रॉनिक्स) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील विवेकानंद महाविद्यालयातून इन्स्ट्रूमेंटेमेशनचा डिप्लोमा पूर्ण केला. हे शिक्षण घेत असतानाच तिला मुंबई मेट्रोचा संदर्भ मिळाला. पुढे तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले. या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे