तब्बल १३ महिन्यांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; पण…

मुंबई, १२ डिसेंबर २०२२ : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १३ महिन्यांनंतर आज जामीन मंजूर झाला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वर्षभरापासून आर्थर रोड येथील तुरुंगात होते. अखेर अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

  • अजून दहा दिवस कोठडीतच

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. यासाठी १० दिवसांची स्थगिती या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली. न्यायालयाने हे म्हणणे ऐकून घेत या निर्णयाला स्थगिती दिली असल्याने जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांना अजून दहा दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण, न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांंचा पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा देशमुख यांनी केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा