पुणे, ता. १३ डिसेंबर २०२२ : वसईतील भुईगाव येथील किनारा साफ करताना दांपत्याला चक्क नोटांनी भरलेली बॅग सापडली. या बॅगेत तब्बल ५७ हजार रुपये होते. मात्र, त्यांच्या आनंदावर काही क्षणातच विरजण पडलं.
वसईत राहणारे लिसबन फराव आणि सुजाव फराव हे दांपत्य आपल्या मुलांसह भुईगाव किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवितात. गेल्या पाच वर्षांपासून ते नियमित किनाऱ्यावर स्वच्छता करतात. रविवारी वसई-विरार मॅरेथॉन असल्यामुळे समुद्र किनाऱ्यावर गर्दी कमी होती. त्यावेळी त्यांना तिथे एक बॅग सापडली. बॅग उघडून पाहताच त्यात ५७,००० रुपये होते. मात्र, या सर्व नोटा जुन्या चलनातील होत्या.
बॅगमध्ये जुन्या नोटा पाहून तेही चकित झाले. यामध्ये १ हजार रुपयांच्या ३ आणि इतर ५०० रुपयांच्या नोटा होत्या. या नोटा मोजल्या असता त्यांची किंमत ५७ हजार रुपये इतकी आढळून आली. फराव कुटुंबीयांनी पैशांनी भरलेली ही बॅग वसई पोलिसांकडे जमा केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
फराव कुटुंबीय वसई समुद्रकिनाऱ्यावर दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवितात. आतापर्यंत त्यांनी ७०० टन कचरा जमा केला आहे. जवळपास एक वर्षापूर्वी स्वच्छता मोहीम राबविताना फराव कुटुंबीयांना हाडं आणि मानवाची कवटी सापडली होती. दरम्यान, नोटांनी भरलेली बॅग समुद्रकिनाऱ्यावर कोणी फेकली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील