पुणे, १८ डिसेंबर २०२२ : चितगाव येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने बांगलादेशच्या संघाचा अवघ्या ५० मिनिटांत खेळ संपवला. ५० मिनिटांत भारताने बांगलादेशच्या ४ विकेट्स घेत पहिल्या कसोटी सामन्यात १८८ धावांनी दणदणीत विजय मिळविला. कुलदीप यादवने २, सिराज आणि अक्षरने प्रत्येकी १ विकेट्स मिळवीत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळविली आहे.
भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करीत यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला. हा सामना भारताने १८८ धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. यावेळी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशचा दुसरा डाव ३२४ धावांवर आटोपला. अक्षर पटेलने तैजुल इस्लामला त्रिफळाचीत करून बांगलादेशचा डाव संपवला. यासह भारताने हा सामना १८८ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. बांगलादेशातील धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वांत मोठा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता भारताला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.
आता दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (ता. २२ डिसेंबर) सुरू होणार आहे. भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध कसोटीतील हा सलग चौथा विजय आहे. कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया अजिंक्य आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील