२४ पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये राजे गट, भाजप २, तर इतर २
फलटण, २० डिसेंबर २०२२ : फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींचा रणसंग्राम आटोपला असून, फलटण तालुक्यात पुन्हा ‘राष्ट्रवादी’प्रणीत राजे गटाची सत्ता आली आहे. २४ पैकी २० ग्रामपंचायतींमध्ये राजे गट, भाजप २, तर २ ग्रामपंचायती इतर गटांच्या ताब्यात गेल्या आहेत.
निवडणुकीपूर्वी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, खासदार गटाला वीसपैकी दोनच ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले; परंतु फलटण तालुक्यातील सर्वांत महत्त्वाची व सर्वांत मोठ्या विडणी ग्रामपंचायतीवर खासदार गटाचा सरपंच निवडून आला. तर राजे गटाचे बारा सदस्य निवडून आल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी राजे गटाची स्थिती झाली आहे.
फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानंतर चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता नुकताच निकाल हाती आला असून, विडणी ग्रामपंचायतीत सरपंचपदी भाजपचे सागर अभंग यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे. तर गिरवी या ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत सह्याद्री कदम गटाने बाजी मारली. सुरवडीत सत्तास्थापनेच्या सारीपटावर प्रल्हादराव पाटील यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. त्यांचेच नेतृत्व सुरवडीवासीयांनी मान्य केले आहे. तर दुधेबावीत भावना सोनवलकर सरपंचपदी विराजमान झाल्या. कुरवली खुर्द येथे राजे गट विजय झाला असून, बहुचर्चित असणाऱ्या वाठार निंबाळकर गटात राजे गटाचा झेंडा फडकला आहे. ताथवडा येथेही राजे गटाचे दशरथ शिंदे हे निवडून आले. तर चौधरवाडीत तुकाराम कोकाटे सरपंचपदी विराजमान झाले. बरड येथे राजे गटाचे उमेदवार विजयी झाले. सोमथळी व पिंप्रद येथेही राजे गटाने विजय संपादन केला आहे. मठाची वाडी, कुरवली खुर्द, ताथवडा, चौधरवाडी येथेही राजे गटाला सत्ता मिळाली आहे.
राजे गटाच्या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी अभिनंदन केले.
तर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे पाटील यांच्यासह तालुक्यातील नेतेमंडळींनी अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार