चीनमधील कोरोना स्फोटाचा भारताला काय धोका? काय म्हणाले तज्ञ?

पुणे, २१ डिसेंबर २०२२: चीनमध्ये कोरोनाची विक्रमी प्रकरणं समोर येतायत. रुग्णालयांबाहेर लांबच लांब रांगा लागल्यात, रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत आणि परिस्थिती मोठ्या प्रमाणावर नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसून येतंय. आता चीनमधील या कोरोना स्फोटामुळं भारताची चिंताही वाढलीय. यापूर्वीही चीननंतर कोरोना विषाणूचा प्रसार जगातील इतर देशांमध्ये झाला होता. त्यामुळं चीनमध्ये निर्माण झालेल्या या संकटाचा परिणाम भारतावरही होणार का? भारताने पुन्हा कोरोना स्फोटासाठी सज्ज व्हावं का?

तज्ज्ञांचं म्हणणं काय

आता अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की चीनमधील परिस्थितीबद्दल भारताला काळजी करण्याची काहीच गरज नाही. ते म्हणतात की आम्ही ऐकत आहोत की चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरस वेगानं पसरत आहे. पण भारताबाबत बोलायचे झाले तर येथे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालंय. प्रौढ लोकसंख्येमध्ये, बहुतेक लोकांना लसीकरण केलं गेलंय. एनके अरोरा यांनी ही माहिती दिली की, कोरोनाचे आतापर्यंत जेवढे प्रकार जगात आले आहेत, त्यांची प्रकरणं भारतात आढळून आली आहेत. अशा परिस्थितीत काळजी न करता फक्त काळजी घेण्याची गरज आहे.

चीनमधील परिस्थिती भयानक का?

चीनमधील कोरोना परिस्थितीबद्दल बोलायचं तर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसून येतंय. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करणंही मोठं आव्हान बनलंय. अमेरिकेतील एका संशोधन संस्थेनं आपल्या अहवालात दावा केला होता की २०२३ मध्ये चीनमध्ये कोरोनाचा स्फोट होऊ शकतो आणि पुढील वर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे आणि हा चीनसाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण अजूनही अनेक वृद्धांना लसीकरण करण्यात आलेलं नाही. चीनच्या अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआच्या मते, आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्येपैकी ८७% लोकसंख्येचं पूर्णपणे लसीकरण केलं गेलंय, परंतु ८० वर्षांवरील वृद्धांपैकी केवळ ६६.४% लोकांचं लसीकरण करण्यात आलंय.

१ संक्रमित १६ मध्ये पसरवतोय व्हायरस

एक आकडा असाही समोर आला आहे की सध्या चीनमध्ये एक कोरोना संक्रमित इतर १६ लोकांना संक्रमित करत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा वेग खूप वेगवान झालाय आणि त्याला रोखणं कोणालाही शक्य होत नाही. असं सांगितलं जातंय की Omicron चे सब-व्हेरियंट सध्या चीनमध्ये कहर करत आहे. जेव्हापासून झिरो कोविड धोरण शिथिल करण्यात आलंय, तेव्हापासून जमिनीवरची परिस्थिती बिकट झालीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा