अनिल देशमुखांना मोठा दिलासा; सीबीआयची याचिका फेटाळली

मुंबई, २७ डिसेंबर २०२२ : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला होता. तो कालावधी आज २७ डिसेंबरला संपला. त्यानंतर आज या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी करत अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता. या आरोपानंतर गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते या प्रकरणात अटकेत आहेत.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा