पानीपत, ३१ डिसेंबर २०२२ :भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पाणीपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे. सुशील मान आणि परमजीत सिंग अशी या दोघांनी नावे आहेत. दोघांनी पहाटे ऋषभ पंतला अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढत इतर लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले होते.
डेपोचे व्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी सांगितले की, आमच्या गाडीचे चालक सुशील मान आणि वाहक परमजीत सिंग यांनी हरिद्वार येथून पाणीपतला जात असताना रस्त्याच्याकडेला एका एसयुव्ही गाडीचा अपघात झाल्याचे पाहिले व ते, बसमधून उतरून अपघातग्रस्त गाडीजवळ पोहोचले. यावेळी जखमी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा अंदाज नसताना देखील त्यांनी, आपल्या जिवाची पर्वा न करता मदत करीत ऋषभ पंतला रूग्णालयात दाखल केले. ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केला आहे. लवकरच राज्य सरकारकडून देखील या दोघांना सन्मानित केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, हरियाणा परिवहन विभागाचे मुख्य सचिव नवदीप सिंग यांनीही दोघांचे कौतुक केले असून, आम्हाला दोघांचाही अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.