ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

कोलकाता, ३ जानेवारी २०२३ :बंगालच्या ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी सकाळी कोलकाता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमित्रा सेन रविंद्र संगीतासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात इंद्राणी सेन आणि श्रावणी सेन या दोन मुली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या निधनाची बातमी त्यांची धाकटी मुलगी श्रावणी सेन हिने फेसबुकच्या माध्यमातून दिली. आज आई आम्हाला सोडून गेली’. मीडिया रिपोर्टनुसार, सुमित्रा यांची २९ डिसेंबर रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. मागील बऱ्याच दिवसांपासून त्या ब्रोको निमोनियाने त्रस्त होत्या. त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी आज आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

पाश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या महान गायिकेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, ‘अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या सुमित्रा सेन यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दुःख झाले आहे. माझे त्याच्याशी जवळचे संबंध होते. त्यांना पश्चिम बंगाल सरकारने २०१२ मध्ये संगीत महासन्मान देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने संगीत जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. सुमित्रा दीदींच्या मुली इंद्राणी आणि श्रावणी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करते.

सुमित्रा सेन यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी झाला होता. अगदी लहानपणापासूनच, त्यांनी रवींद्र संगीत शिकण्यास सुरुवात केली आणि त्या त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध होत्या. ‘मेघ बोलेछे जाबो जाबो’, ‘सखी भबोना कहारे बोले’ सोबत ‘तोमारी झारनतालार निर्जन’ यांसारख्या रवींद्र संगीतांसाठी सुमित्रा लोकप्रिय आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा