काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे निधन; भारत जोडो यात्रेत आला हृदयविकाराचा झटका

जालंधर , १४ जानेवारी २०२३ :पंजाब जालंदरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते ७६ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले आहेत.

  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांचे ट्विट

त्यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले की, ‘जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झालं3 आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’, असे म्हटले आहे.

संतोख सिंह चौधरी यांचा जन्म १८ जून १९४६ रोजी झाला होता. ते पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातून खासदारही राहिले आहेत. संतोख यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. सध्या जालंधर लोकसभा मतदारसंघातून त्यांचा संसदीय कार्यकाळ सुरू होता. दरम्यान, यापूर्वी, त्यांनी फिल्लौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत (१९९२ ते १९९७) या काळात काँग्रेस सरकारमध्ये राजिंदर कौर भट्टल आणि हरचरण सिंग ब्रार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते.

दरम्यान, खासदार चौधरी संतोख सिंह यांचे पार्थिव त्यांच्या जालंधर शहरातील न्यू विजय नगर येथील निवासस्थानी आणले जाणार असून, तेथे अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवले जाणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा