अरेरे! आईचा अंत्यविधी सुरू असताना आईला शोधत चिमुकला रस्त्यावर; पण आई कधीच भेटणार नाही, हे त्याला कोण सांगणार?

पुणे, २० जानेवारी २०२३ : आईचा अंत्यविधी सुरू असताना तिचा चिमुकला मुलगा आईच्या शोधात बाहेर पडला. नातेवाईक अंत्यविधीत व्यस्त असल्याने चिमुकला रस्त्याने आई आई करीत निघाला. रस्त्याने आईच्या शोधात फिरताना तो जखमी झाला. तरी आई आई म्हणत तो रस्त्याने आईला शोधतच राहिला. जखमी अवस्थेतील या चिमुकल्याला पाहून दोन महिलांनी पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांकडे स्वाधीन केले. मन हेलावून टाकणारी घटना मंगळवारी (ता. १७ जानेवारी) औरंगाबाद शहरातील जवाहर कॉलनी भागात घडली.

याविषयी अधिक माहिती अशी, की मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथील गिरीराज सोनी हे पत्नीच्या उपचारासाठी तीनवर्षीय मुलासह औरंगाबादेत आले होते. दुर्दैवाने उपचार सुरू असताना सोमवारी (ता. १६ जानेवारी) पत्नीची प्राणज्योत मालवली. इंदूर येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी औरंगाबादमध्ये सर्व नातेवाईक असल्याने त्यांनी औरंगाबादेत अंत्यविधी करण्याचे ठरविले. मंगळवारी (ता. १७ जानेवारी) अंत्यविधी करण्यात सर्व नातेवाईक व्यस्त असताना तीनवर्षीय चिमुकला निखिल गिरीराज सोनी आईच्या शोधात बाहेर पडला. अंत्यविधी संपल्यानंतर निखिल दिसत नसल्याने त्याचा शोध सुरू केला; मात्र तो आढळून आला नाही. रस्त्याने तो आईला शोधत निघाला होता.

दरम्यान, तीन वर्षांच्या चिमुकल्याची आई या जगात नाही. आता ती त्याला कधीच भेटणार नाही, हे त्याला कोण सांगणार? तो रस्त्याने रडत रडत आईला हाक मारत होता. आईला शोधत असताना रस्त्यावर पडून त्याचे डोके फुटले. तरीही रक्तबंबाळ अवस्थेत तो आईला शोधत होता. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांनी पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी तातडीने पोचत मुलाला जवळ घेत विचारपूस केली. महिला पोलिसांच्या स्वाधीन करून सोशल मीडियावरून प्रसार केला. अखेर अनेक तासांच्या शोधानंतर पोलिसांना पालकांना शोधण्यात यश आले. निखिलच्या वडिलांनी जेव्हा घडलेली हकीकत सांगितली, तेव्हा उपस्थित पोलिसांचेही डोळे पाणावले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा