आळेफाटा, २२ जानेवारी २०२३ : आळेफाटा येथील ज्ञानमंदिर हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षक आणि सहकारी शिपायाकडून अमानूषपणे मारहाण प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपप्राचार्य आणि शिपायाविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. उपप्राचार्य जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिकची माहिती अशी, की ज्ञानमंदिर हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या आवारात शिक्षकांकडे पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षक आणि शिपायाने १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याच दरम्यान एका मुलाने आपल्या मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण केले आहे.
पोलिस शिपाई अमित मालुंजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३२३, ५०४, ३४ सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण २०१५ वे कलम ७५ बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण २००० चे कलम २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल पवार करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर