पुणे, २८ जानेवारी २०२३ : वाढती रहदारी लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचा प्रवास लवकर, सोपा व्हावा, यासाठी ‘पीएमपीएल’ने आतापर्यंत अनेक योजना राबविल्या आहेत. महिलांसाठी ‘तेजस्विनी’च्या रूपाने सुरू केलेली स्वतंत्र बस असू द्या किंवा एसी बस. सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी ‘पीएमपीएल’ने ‘बीआरटी’ बससेवा सुरू केली; पण या ‘बीआरटी’ मार्गातून सर्रास खासगी वाहनांचीच मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होताना दिसत आहे.
‘बीआरटी’ मार्गावर बसखेरीज अन्य कुठलेही वाहन येणे अपेक्षित नसते; त्यामुळे बस भरधाव वेगाने या टोकापासून त्या टोकापर्यंत धावतील आणि वेळ वाचत असल्याने नागरिक खासगी वाहनांच्या तुलनेत ही विशेष बससेवा वापरतील, असे यात गृहीत धरण्यात आले होते; मात्र सुरवातीला केवळ पीएमपीएल बससाठीच राखीव असलेल्या या मार्गात हळूच इतर वाहनांचा प्रवेश झाला. सुरवातीला ॲम्ब्युलन्ससाठी रास्तपणे परवानगी देण्यात आली. नंतर एसटीच्या बसगाड्याही या मार्गाने जाऊ लागल्य. आणि आता तर ‘बीआरटी’ मार्गातून ‘पीएमपीएमएल’च्या बस कमी व इतर खासगी वाहतूकच जास्त होत असल्याचे पाहायला मिळते. एखाद्या वेळेस रुग्णवाहिकाचालकाने यातून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही येथे कसरत करीतच वाहन बाहेर काढावे लागते; वाहतूक कोंडी झाली असताना, फूटपाथवर दुचाकी गाड्या चढविणाऱ्या नागरिकांना मोकळ्या पडलेल्या बीआरटी मार्गात घुसण्याचा मोह झाला नसता तरच नवल! हळूहळू ही घुसखोरी एवढी वाढली, की शेजारचा सर्वसामान्य मार्ग आणि बीआरटीचा विशेष मार्ग यातला फरकही आता कळेनासा झाला.
दरम्यान, ‘पीएमपीएल’ बसचालकांना बीआरटी मार्गाचाच मुख्य अडथळा असून, सामान्य रस्ता आणि बीआरटी मार्गिका अशा दोन्हींमधून खासगी वाहनांची वाहतूक यामुळे बस प्रवासाला अधिक वेळ लागत आहे. परिणामी सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्यातील विविध भागांत ये-जा करणारे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी असो, अथवा नोकरी-व्यवसायानिमित्त जाणारे नागरिक असो. सर्वांनाच ही एक प्रकारची डोकेदुखी ठरत आहे. कारण अनेकवेळा शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना तासिकांना मुकावे लागते, तर नोकरी करणाऱ्यांना वेतन कपातीस सामोरे जावे लागते. वारंवार प्रशासनाने बॅरिकेड्स किंवा रस्ता दुभाजक बांधून हा मार्ग बंदिस्त करूनही नागरिक नियम मोडताना दिसतात. तरी संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करून यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, एवढे मात्र खरे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील