बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन दिल्ली विद्यापीठात गोंधळ; कलम १४४ लागू

नवी दिल्ली, २८ जानेवारी २०२३ : बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन सध्या वाद उफाळून आला आहे. हा वाद आता देशभरातील विद्यापीठांमध्ये ठाण मांडून बसला आहे. दिल्ली विद्यापीठातही या डॉक्युमेंट्रीवरुन जोरदार गोंधळ झाला. एनएसयूआय आणि केएसयू या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. एनएसयूआयचे विद्यार्थी तेथे पोहोचल्यानंतर गोंधळ घालत आहेत. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहता पोलिसांनी १४४ कलम लागू केले आहे.

सरकारने BBC डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली आहे. मात्र, या डॉक्युमेंट्रीवरुन सुरू झालेला वाद कायम आहे. दिल्ली विद्यापीठात मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. दिल्ली विद्यापीठातील कॉंग्रेसचे संघटन असलेल्या एनएसयूआय या संघटनेने, तसंच KSU च्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग करण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रशासनाने या स्क्रीनिंगला विरोध केला.

प्रशासनाने विरोध केला म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी १४४ कलम लागू केले आहे.

दिल्ली विद्यापीठाआधी जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग करण्याचं नियोजन केले होते. परंतु या दोन्ही विद्यापीठांमध्ये प्रशासनाने ही डॉक्युमेंट्री दाखवू दिली नाही. जेएनयूमध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या स्तरावर हा माहितीपट त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर पाहिला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा