मुरैना, २८ जानेवारी २०२३ :राजस्थानच्या भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना ताजी असतानाच, मध्य प्रदेशात हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानांना भीषण अपघात झाला. मुरैना येथे शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सुखोई -३० आणि मिराज – २००० ही लढाऊ विमाने कोसळली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरु केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमाने कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते जेथे सराव सुरू होता. सुखोई-३० मध्ये दोन वैमानिक आणि मिराज २००० विमानात एक पायलट होता. प्राथमिक वृत्तानुसार, दोन पायलट सुरक्षित आहेत, तर तिसऱ्या पायलटला वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राजनाथ सिंह यांनी घेतला घटनेचा आढावा
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या प्रमुखांकडून फोनवरून माहिती घेतली. या अपघाताची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने संरक्षण मंत्रालयाला देण्याचे आदेश दिल्याचे एएनआयच्या सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर बचावकार्य वेगाने राबवण्यात यावे, असे आदेशही राजनाथ सिंह यांनी दिले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.