सोलापूर येथे महामार्ग ओलांडताना अंदाज न आल्याने ३० फुटांवरून भुयारी मार्गात पडून १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर, २९ जानेवारी २०२३ : केगाव ते हत्तूर या बाह्यवळण महामार्गावरील देशमुख वस्ती परिसरात रस्ता ओलांडताना अंदाज न आल्याने ३० फूट उंच पुलावरून १४ काळविटांच्या कळपाने एकामागून एक उड्या मारल्या. त्यात १२ काळविटांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन काळवीट गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी (ता. २८) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

याविषयी प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातून नेहमीच काळवीट आणि इतर प्राणी रस्ता ओलांडत असतात. मृत्युमुखी पडलेला काळविटांचा कळप हा माळरानावर अन्न-पाण्याच्या शोधात फिरत होता. त्यावेळी काही भटकी कुत्री कळपांच्या मागे लागल्याने हे काळवीट रस्ता मिळेल त्या दिशेने सुसाट धावत होते. देशमुख वस्ती परिसरात नवीन बायपास रस्त्यालगतच्या सर्व्हिस रस्त्यानंतर अचानक ३० फूट खोल भुयारी मार्ग केलेला आहे. माळरानावरून सर्व्हिस रस्त्याकडे पळत आलेल्या काळविटांच्या कळपाने पुढे रस्ता असेल असे समजून मारलेली उडी ३० फूट खाली भुयारी रस्त्यावर पडली. उंचावरून डोक्यावर आदळल्याने काळविटांचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर शहरातील जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी पुणे रस्त्यावरील केगाव येथून हत्तूरपर्यंत बाह्यवळणाचे काम पूर्ण झाले. या नवीन बायपास रस्त्यावरील देशमुख वस्ती येथे सर्व्हिस रस्त्यालगत मोठा भुयारी रस्ता आहे. वन्यप्राणी माळरानावरून पळत जाताना थेट त्या भुयारी रस्त्यावर पडण्याचा धोका कायम असतो. त्यासाठी सर्व्हिस रस्त्यालगतच्या कठड्यास दहा फूट उंचीचे जाळीचे संरक्षक कुंपण उभारण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये दाेन काळविटांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी प्राणी मित्रांनी त्यांच्या सुरक्षेचे उपाय करण्याची मागणी केली हाेती; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभागाने अद्यापपर्यंत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत, असा संताप प्राणिमित्रांनी व्यक्त केला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा