ढवळेवाडी (आसू) येथे गाईच्या ओटीभरणाचा व डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात

फलटण (जि. सातारा), ३१ जानेवारी २०२३ : ढवळेवाडी (आसू) येथे सुंदरी नावाच्या देशी गाईचे डोहाळे जेवण व ओटीभरण कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

याविषयी अधिक माहिती अशी, की फलटण तालुक्यातील पूर्व भागातील असणाऱ्या ढवळेवाडी आसू येथील प्रसिद्ध उद्योजक मयूर पवार व लखन पवार यांच्या राहत्या घरी असणाऱ्या सुंदरी नावाच्या गाईचा महिलांच्या उपस्थितीमध्ये ओटीभरण व साडी-चोळी अंगावरती टाकून; तसेच हळदी-कुंकू लावून औक्षण करण्यात आले.

भारतीय संस्कृतीमध्ये देशी गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यापासून असणाऱ्या प्रत्येक वस्तूला आयुर्वेदामध्ये अधिक महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण देशी गाय पाळतात. पवार कुटुंबाकडेही सुंदरी नावाची गाय असून, सध्या ती गर्भावस्थेत असल्यामुळे तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम या कुटुंबाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे जवळचे पाहुणे, मित्रपरिवार, नातेवाईक यांना निमंत्रित करून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी गाईला गरम पाण्याने अंघोळ घातली. गाईला हार- फुलांनी सजविण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती. पाट, रांगोळी, विविध प्रकारची फळे ताटात मांडण्यात आली होती. उपस्थित महिलांनी गाईला हळदी-कुंकू लावत तिचे ओटीभरण केले. या अनोख्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा