झारखंड : धनबादमध्ये टॉवरला भीषण आग; १४ जणांचा होरपळून मृत्यू

13

धनबाद, १ फेब्रुवारी २०२३ : झारखंड येथील धनबादमधील इमारतीला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली असून, या आगीत १० महिला आणि ३ मुलांसह एकूण १४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , झारखंडमधील धनबाद येथील टॉवरला लागलेल्या आगीत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती मंदिराजवळील टॉवरला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली.

पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, इमारतीत लग्न कार्य सुरु होते. पण, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • मुख्यमंत्री सोरेन यांनी व्यक्त केले दुःख

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती दुःख व्यक्त केले. आगीत जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनबादमधील आगीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतकांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.