वर्धा, ३ फेब्रुवारी २०२३ :वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यावेळी महिलाही आक्रमक दिसून आल्या. यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री भाषण देत होते. दरम्यान, प्रेक्षकांमधून अचानक महिला आणि पुरुषांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहीजे, बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या थांबल्याच पाहीजे अशा घोषणा देणे सुरु केले.
- तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त आहेत. तसेच सरकार स्थापन करुन खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखवत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी कागद देखील भिरकावली. तसेच बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचे गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
- सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी : मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. मात्र, हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी विदर्भवाद्यांना केले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.