नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी २०२३ : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता काव्यात्मक पद्धतीने त्यांच्यावर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अनेक लोकांनी आपापले आकडे सादर केले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
- भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था
दरम्यान, आव्हानांशिवाय आयुष्य नाही. मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थवान १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचे धैर्य, साहस मोठे आहे. कठीण काळ, युद्धासारखी परिस्थिती, अनेक देशात असलेली अस्थिरता, भीषण महागाई, अन्नाचा तुटवडा आणि आपल्या शेजारील देशात नागरिकांना खायला अन्न मिळत नाही. अशावेळीही आपला भारत देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाषणात म्हटले आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.