फलटण, १३ फेब्रुवारी २०२३ : निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रोलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी पाणी पळविले असल्याचा आरोप केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. सोमवार (ता. १३) पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. शेखावत बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार प्रशांत परिचारक (मालक), आमदार समाधान आवताडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा पाणी तंटा लवादमधील नियमानुसार एका खोऱ्यातले पाणी दुसऱ्या खोऱ्यात आणता येत नाही. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना रखडली; पण कृष्णा पाणी तंटा लवादमधील पाणीवाटपाची फेररचना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही फेररचना करण्यासाठी ब्रीजेशकुमार आयोगाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांच्यात सध्या कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद सुरू आहेत. या वादात तेलंगणा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे; पण हा प्रश्न निकाली निघेल, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
राज्यातील ९४ तालुक्यांपैकी ५६ तालुके कृष्णा खोऱ्यात व पश्चिम महाराष्ट्रात येतात. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील ५६ तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राजस्थानसारख्या ज्या राज्यातून आम्ही येतो तिथेही पाणीटंचाईचा प्रश्न गहन आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेबद्दल आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. शेखावत यांनी केले.
निरा देवघर सिंचन प्रकल्प हा राज्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरीत्या प्रयत्न करेल व सकारात्मक पाऊल उचलेल. निरा देवघर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीही प्रयत्न केले होते. केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने दोन वेळा आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती; मात्र पूर्वीच्या सरकारने याबाबत वेळकाढूपणाची भूमिका घेतली. अन्यथा, हा प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाला असता; पण निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रोलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांना पाणी पळवायचे होते, असे ना. शेखावत यांनी स्पष्ट केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, की आपण केलेल्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतल्यानंतर माढा, करमाळ्यासह संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला कृष्णेच्या पाण्याचा लाभ होईल, अशी आशा ना. शेखावत यांच्या दौऱ्याने दिसत आहे. दरम्यान, सोमवार (ता. १३) निरा- देवघर सिंचन प्रकल्पाच्या वाघोशीपर्यंत झालेल्या कालव्याच्या कामाची पाहणी, तद्नंतर प्रस्तावित लाभक्षेत्राची पाहणी व इतर विविध कामांची केंद्रीय जलसंपदा मंत्री ना. गजेंद्र शेखावत यांनी पाहणी करून माहिती घेतली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार