नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२३ : दुबईहून तिरुअनंतपुरमला येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (IX540) फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. आणि त्यानंतर पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इमर्जन्सी च्या घोषणेमुळे विमानतळावर सर्व व्यवस्था करण्यात आली होती.
विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, इमर्जन्सी लँडिंगसाठी धावपट्टी मोकळी करण्यात आली आणि विमान विमानतळावर सुरळीतपणे उतरविण्यात आले. या घटनेमुळे कोणत्याही अन्य विमानांचे मार्ग वळवण्यात आले नाहीत. नागरी विमान वाहतूक महासंचालक या घटनेची चौकशी करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असेच एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. लखनौ विमानतळावरून उड्डाण करताच विमानावर पक्षी आदळला. या दरम्यान १८० प्रवासी थोडक्यात बचावले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.