पाटणा, २० फेब्रुवारी २०२३ : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत अनेक दिवसांच्या मतभेदानंतर उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूचा राजीनामा देत रामराम केले आहे. यावेळी कुशवाह यांनी JDU सोडण्याची घोषणा करत नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा केली आहे. ‘राष्ट्रीय लोक जनता दल’ असे कुशवाह यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल.
नवीन पक्षाची घोषणा करताना उपेंद्र कुशवाह म्हणाले की, आजपासून मी नवी राजकीय खेळी सुरू करत आहे. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना म्हटले की, JDU मधील काही लोक वगळता, सर्वजण पक्ष कसा चालवणार याची चिंता व्यक्त करत होते. मी निवडून आलेल्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी सुरुवातीच्या टप्प्यात खूप चांगले काम केले. पण शेवट वाईट होत आहे. त्यांनी ज्या मार्गाने चालण्यास सुरुवात केली ती त्यांच्या आणि बिहारसाठी वाईट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी आम्ही जेडीयूमध्ये आलो तेव्हा राज्यासमोरील परिस्थिती वेगळी होती. त्याआधी जनतेने जननायकाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी लालू यादव यांच्यावर सोपवली होती. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नसल्याने २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींना विजय मिळवणे सोपे जाईल, असेही कुशवाह यावेळी म्हणाले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.