ITI आणि डिप्लोमा पास आउट देखील आता बनणार ‘अग्निवीर’; नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२३ : भारतीय लष्कराने १६ फेब्रुवारी रोजी अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती, त्यानुसार अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सध्या उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यात भरती प्रक्रिया सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारने अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये पुन्हा मोठा बदल केला आहे.

नव्या बदलानुसार आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले ​​असून, ITI- पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेतील विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार आहे.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च

ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. तसेच, यासाठी निवड प्रक्रिया १७ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे.

  • कोणाला करता येणार अर्ज ?

१६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान ६० टक्के गुणांसह १२ वी पास असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी ८ वी- १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा