औरंगाबाद/ छत्रपती संभाजीनगर, २८ फेब्रुवारी २०२३: जी -२० अंतर्गत वूमन २० परिषदेसाठी विविध देशातून १५० महिला प्रतिनिधी या परिषदेसाठी शहरात दाखल झाल्या आहेत. दोन दिवसीय परिषदेसाठी महिला सक्षमीकरणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चा सत्रानंतर या शिष्टमंडळाने ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यातील औरंगाबाद लेणी आणि ‘दख्खन का ताज’ म्हणून ओळख असलेल्या बीबीका मकबऱ्याला भेट देण्यात आली होती. या भेटीत शिष्टमंडळ अक्षरशः भारावून गेलं होतं. महिला शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्याने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळं अधिकच सुंदर दिसत होता.
लेणीकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला रांगोळी काढण्यात आल्या होत्या, यामुळं रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली होती. वातानुकूलित बसेसमधून लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट देण्यात आले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेलं होतं. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
औरंगाबाद लेणी पाहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असलेल्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचं स्वागत तुतारी व सनई चौघडयाच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आलं. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. बीबीका मकबरा परिसर व परिसरातील वास्तूंचं सौंदर्य पाहून आनंदही व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले