डोंबिवलीत जोशीमठसारखी परिस्थिती; इमारतींना तडे, २५० कुटुंबे बेघर

ठाणे, ६ मार्च २०२३ : डोंबिवली (जिस. ठाणे) येथे पाच इमारती प्रशासनाने पूर्णपणे रिकामी केल्या आहेत. इमारतींचे स्लॅब सैल झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच इमारतीच्या खांबांनाही भेगा पडल्या आहेत. जवळपास २५० कुटुंबांनी आपली घरे रिकामी केली आहेत. त्याचबरोबर इमारतीच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोपही काही जण करीत आहेत.

शनिवारी (ता. ४) रात्री ११ वाजता स्लॅब आणि खांबांना तडे गेल्याचे दिसून आले. यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस आणि नागरिकांनी निलजे येथील आवारात पोचून इमारती रिकाम्या करून घेतल्या. या इमारती १९९८ मध्ये बांधण्यात आल्याचे महापालिकेचे उपअग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारती नाहीत. संरचनात्मक तपासणी करून प्रभाग अधिकारी या इमारतींबाबत निर्णय घेतील.

यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे नामदेव चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षेच्या कारणास्तव लोकांना परिसरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहोत. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना जवळच्या सरकारी शाळा आणि मंदिरांमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आहे; मात्र अनेकजण नातेवाइकांच्या घरी गेले आहेत.

रविवारी संध्याकाळी इमारतीत राहणारे लोक घरातील सामान बाहेर काढण्यासाठी आले होते; परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना इमारतीत येऊ देण्यास साफ नकार दिला. त्याचबरोबर ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये बिल्डरांच्या विरोधात नाराजी दिसून येत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा