इंडोनेशियातील माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; सात किलोमीटर उंचीवर गेला राखेचा फुगा

15

इंडोनेशिया, १२ मार्च २०२३ : जगातील सर्वांत सक्रिय ज्वालामुखींमधील एक इंडोनेशियामधील माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की, या उद्रेकातून निर्माण झालेला गरम राखेचे ढग तब्बल सात किलोमीटरपर्यंतच्या उंचीवर पोचले. यामुळे या ज्वालामुखीच्या जवळील गावांवर राखेचे थर पसरले. प्रशासनाने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे जवळपासच्या गावांवर राखेचा पाऊस झाला. या भीषण आणि शक्तिशाली स्फोटातून निर्माण झालेली राख आणि धुराचा भुगा जवळपास सात किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत पोचला. यावरून या स्फोटांची तीव्रता लक्षात येते. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आसपासच्या गावांतील लोकांना आणि पर्यटकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी पोचविले आहे.

इंडोनेशियाची सांस्कृतिक राजधानी याग्याकार्ताजवळ असलेल्या जावा द्वीपजवळील या ज्वालामुखीची उंची ९७३७ फूट इतकी आहे. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना या परिसरातून दूर जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, सध्या या घटनेत नुकसानीचा अंदाज लावणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर