नवी दिल्ली, १७ मार्च २०२३: महाराष्ट्रातील शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी गुरुवारी (१६ मार्च) संपली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय, आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र आणि संपूर्ण देश निर्णयाची वाट पाहतोय, पण या खटल्याच्या सुनावणीतून आणि निर्णयातून शिकण्याची, समजून घेण्याची इच्छा परदेशातही आहे. यामुळंच केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था के कुमे सर्वोच्च न्यायालयातील शेवटच्या दिवशीची सुनावणी ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोर्टात पोहोचल्या.
केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या तेव्हा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिवसेना वादावर चर्चा आणि युक्तिवाद सुरू होता. न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिम्हा या पाच सदस्यीय खंडपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते. केनियाचे सरन्यायाधीश संपूर्ण सुनावणीदरम्यान उपस्थित होते आणि त्यांनी न्यायालयाचं कामकाज उत्सुकतेने पाहिलं.
केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था के. कूम यांचं आगमन झाल्यावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाला या खटल्याची माहिती दिली. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांनी भारताच्या कायदेशीर प्रक्रियेचं अत्यंत बारकाईने निरीक्षण केलं आणि तपासलं आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची न्यायव्यवस्था कशी आहे हे समजून घेतलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड