केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर होणार कमी

14

मुंबई, ७ एप्रिल २०२३: गॅसच्या किंमतीबाबत किरीट पारेख समितीनं केलेल्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला की पीएनजी आणि सीएनजी स्वस्त होतील. यासोबतच नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी २०१४ च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती पाच ते सहा रूपयांनी कमी होतील.

प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आता आंतरराष्ट्रीय हब गॅसच्या किमतीऐवजी गॅसच्या किमतीला आयात कच्च्या तेलाशी जोडण्यात आले आहे. आणि घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या १० टक्के असेल, जी दर महिन्याला निश्चित केली जाईल. म्हणजेच आता घरगुती नैसर्गिक वायूचे दर महिन्याला निश्चित केले जातील.

दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. कारण तेल विपणन कंपन्यांना नफा मिळू लागला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरही दर महिन्याला निश्चित होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. महत्त्वाचे कारण म्हणजे येत्या महिन्यात कर्नाटकात निवडणुका आहेत, त्यानंतर पेट्रोलचे दर स्वस्त होऊ शकतात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड