इतिहासातील पानिपतचे युद्ध आपण अभ्यासलेच आहे. मात्र, हे युद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ‘पानिपत’ चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांसमोर सादर केले आहे. जाणून घेऊयात कसा आहे चित्रपट..
चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक मोहीम फत्ते करून सदाशिवराव (अर्जुन कपूर) पुण्याला परततात.
नानासाहेब पेशव्यांनंतर (मोहनिश बहल) त्यांच्या मुलाला (अभिषेक निगम) पेशव्यांची गादी मिळावी असे नानासाहेबांच्या पत्नी गोपिका बाई (पद्मिनी कोल्हापूरे) यांना वाटते. सदाशिवराव हे शूर असल्याने त्यांना गादी मिळेल अशी भीती असल्याने नाना पेशव्यांना सांगून गोपिका बाई युद्धाची नव्हे तर आर्थिक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सदाशिवरावांना देतात.
या दरम्यान सदाशिवरावांचे लग्न पार्वती बाई (क्रीती सॅनॉन) सोबत होते. काही दिवसांनी अहमद शाह अब्दाली (संजय दत्त) भारतावर स्वारी करण्यासाठी आला असता त्याला रोखण्यासाठी सदाशिवराव सैन्य घेऊन निघतात.
नंतर पानिपतला झालेले युद्ध चित्रपटाच्या शेवटच्या ३० मिनिटांत पाहायला मिळते. उर्वरित अनेक नाट्यमय तसेच महत्वाच्या घडलेल्या घडामोडींसाठी चित्रपट संपूर्ण पाहणे आवश्यक ठरते.
ऐतिहासिक चित्रपट असल्याने तसा आभास निर्माण करण्यास व तो भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. सिनेमॅटोग्राफी, नायकांच्या रंगभूषा व पेहराव, संकलन या सर्व बाजूंनी चित्रपट खरा उतरला आहे. चित्रपटाची गाणी देखील चांगली झाली आहेत.
अर्जुन कपूर, क्रीती सॅनॉन यांनी चांगला अभिनय केला असला तरी संजय दत्ताच्या अभिनयाची विशेष दाद द्यावी लागेल.
मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, नवाब शाह, साहिल सलाथिया यांनी त्यांच्या भूमिका खऱ्या अर्थाने हुबेहूब साकारल्या आहेत.
पानिपतच्या लढाईचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नाही. मात्र हा चित्रपट पाहण्याआधी पेशव्यांचा प्राथमिक इतिहास तसेच त्यांच्यातील नातेसंबंध यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे चित्रपट समजायला मदत होते.