विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या सासरवाडीतील ‘त्या’ फलकाची धाराशिवमध्ये चर्चा! कारण….

धाराशिव, २५ एप्रिल २०२३: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शक्यता, अशक्यतांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशा भावना व्यक्त करणारे फलक राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सासूरवाडी तेर धाराशिव येथे लागले आहेत. या फलकाची धाराशिव जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

तेर गाव हे अजित पवार यांची सासूरवाडी, या गावातील अनेक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार’ असे फलक लावले आहेत. यावरुनच सासूरवाडीलाही अजित दादांच्या मुख्यमंत्री पदाची आस लागली असल्याचे दिसू लागले आहे. गावचे सुपुत्र माजी मंत्री, जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनाही मुख्यमंत्रीपदाने अनेकदा हुलकावणी दिली. त्यामुळे या पदाच्या सुखापासून पारखे राहीलेल्या तेर वासियांनी आता जावाई असलेल्या अजित दादांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या आहेत.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. डॉ. पाटील यांचे सुपुत्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अजित पवार भावी मुख्यमंत्री पदाचे फलक मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उभारले आहेत. याची वेगळीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. या कार्यकर्त्यांनी संत गोरोबाकाका मंदिरात विशेष पुजा करुन अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडेही घातलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा