दिल्ली, २९ एप्रिल २०२३: २०२० मधील महाराष्ट्रातील हृदयद्रावक पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआय करणार. याची माहिती महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत सीबीआयकडे तपास सोपवण्याचा निर्णय मंजूर केला. हे प्रकरण आता तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सादर करण्यास सांगितले.
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची एका बेकायदेशीर जमावाने हत्या केली. मुलाच्या अपहरणाच्या अफवांवरून ही हत्या करण्यात आली होती. साधू त्यांच्या त्यांच्या आध्यात्मिक गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी गुजरातमधील सुरतला जात होते. शॉर्टकटसाठी ते साधू गावाच्या आतल्या रस्त्याकडे वळले होते. तेव्हा वाटेत गावकऱ्यांनी त्यांना अडवून संशयाच्या आधारे तिघांचीही हत्या केली. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक करत होते. तर उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्र पोलिसांच्या तपासानंतर सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे म्हटले.
निरपराध साधूंची हत्या झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यात उध्दव ठाकरे सरकार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला. ठाकरे सरकारला हिंदुद्रोही म्हटले गेले. या हत्याकांडानंतर महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने सुमारे २५० जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड