उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचे एन्काउंटर

12

उत्तर प्रदेश, ४ मे २०२३ : उत्तर प्रदेशमध्ये गँगस्टर एन्काउंटर सत्र सुरूच आहे. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना उर्फ अनिल नागर हा आज चकमकीत ठार झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ ने मेरठमध्ये धडक कारवाई केली. दुजाना विरुद्ध नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्हे दाखल होते.

गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी दुजाना आणि त्यांच्या दोन साथीदारांनाही अटक केली होती. दुजाना हा गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी होता. २०२१ मध्ये साहिबाबाद मध्ये एका लग्न समारंभात त्यांच्या टोळीने गोळीबार केला होता. ज्यामध्ये तीनजण ठार झाले होते. अनिल दुजाना हा १० एप्रिल रोजी जामिनावर सुटला होता. दिल्ली आणि युपीचे पोलीस त्याचा शोध घेत होते. तो मेरठमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील माफियांवर धडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ या विशेष शाखेने मागील सहा वर्षांमध्ये एकूण १८४ एन्काउंटर केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर