राजस्थान १० मे २०२३:राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यातील सर्वात घातक वाघ T-१०४ उर्फ चिकूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वनविभागाने रणथंबोर येथील भीड नाका परिसरात मंगळवारी सकाळी T-१०४ उर्फ चिकू या ३ माणसांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद केले आणि पुढील ट्रीटमेंट साठी त्याला मंगळवारीच रणथंबोरहून उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये पाठवलेे. तेथे आधी त्याला पिंजऱ्यात ठेवून देखरेख करण्यात आली. मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला पार्कमध्ये मोकळे सोडण्यात आले. काही तासांच्या अवधीनंतर तो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मृत अवस्थेत आढळला.
रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचे DFO मोहित गुप्ता सांगतात की, उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये T-१०४ वाघाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. परंतु मला या प्रकरणाची फारशी माहिती नाही.रणथंबोरहून वाघाला सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये पाठवल्यानंतर हा वाघ पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र अवघ्या काही तासांत वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चिकू (वाघ) तिथल्या तलावात जाऊन बसला. सुमारे तासभर पाण्यात बसून राहिल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास तो पाण्याबाहेर आला आणि एका जागी जाऊन बसला. यादरम्यान वनविभागाकडून वाघावर सतत नजर ठेवण्यात येत होती. रात्री गस्तीवर असलेले वन कर्मचारी वाघाला पाहण्यासाठी परत आले असता, तो निपचित पडलेला त्यांना दिसला. वन कर्मचाऱ्यांनी आवाज करून वाघाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो हलला नाही. कर्मचारी जवळ गेले तेव्हा त्यांना तो मृत अवस्थेत आढळला. सज्जनगड बायोलॉजिकल पार्कच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही.
सज्जनगड बायोलॉजिकल पार्कचे डीएफओ अजय चित्तोडा यांनी सांगितले की, अतिउष्णतेमुळे चिकू वाघाला एसी वाहनातून, रणथंबोरहून उदयपूरला रस्त्याने आणण्यात आले. त्याने रात्री तलावातील पाणी प्यायले आणि खाल्लेही होते. पण अचानक त्याचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.