नेपाळच्या पासंग दावा शेर्पा यांनी २६ व्या वेळी केले एव्हरेस्टवर सर, एव्हरेस्ट चढाईच्या विश्वविक्रमाची बरोबरी

काठमांडू, नेपाळ १५ मे २०२३: रविवारी २६ व्या वेळी नेपाळच्या पासंग दावा शेर्पा यांनी एव्हरेस्टवर सर केले. पासंग यांनी १९९८ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. तेव्हापासून ते दरवर्षी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करत आहेत. कालच्या यशस्वी चढाई सोबतच त्यांनी एव्हरेस्ट चढाईच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

पासंग दावा शेर्पा हे त्यांच्या गिर्यारोहण कौशल्यासाठी ओळखले जातात. ते परदेशी गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढण्यासाठी मदत करतात. प्रत्येक गिर्यारोहकासोबत शेर्पा असणे आवश्यक आहे. पासंग यांनी रविवारी हंगेरियन गिर्यारोहकासोबत एव्हरेस्ट शिखर गाठले. ४६ वर्षीय पासंग दावा शेर्पा यांनी दुसरे नेपाळी शेर्पा कामी रीता यांच्या विक्रमाची बरोबरी केली. कामी रिता यांनी गेल्या वर्षी २६ व्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. यावर्षीही ते एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात यश आल्यास त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाईल.

यंदा एव्हरेस्टच्या पहिल्या चढाईला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि त्यांचे शेर्पा मार्गदर्शक तेनझिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. तेव्हापासून आतापर्यंत अकरा हजारांहून अधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई झाली आहे.

येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने लोक एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. गिर्यारोहक साधारणपणे एप्रिल महिन्यात एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचतात. उंची, खडबडीत भूभाग आणि वारा यांच्याशी जुळवून घेण्यासाठी ते येथे काही आठवडे राहतात. ते मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एव्हरेस्टवर चढाई करण्याचा प्रयत्न करतात. या वर्षी एप्रिलमध्ये तीन शेर्पा मार्गदर्शक दरीत पडल्याने चढाईला विलंब झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा