अमेरिका, १६ मे २०२३: पाण्याखाली राहणे ही खरतर एका हॉलिवुड चित्रपटातील कल्पना वाटते. पण एका यूएस प्राध्यापकाने प्रत्यक्षात ही कल्पना जगली आहे. त्याने पाण्याखालील केबिनमध्ये ७४ दिवसांपेक्षा जास्त काळ घालवला आहे. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ दितुरी हे गेल्या ७४ दिवसांपासून की लार्गो येथील ज्युल्स अंडरसी लॉजमध्ये जमिनीपासून ३० फूट खाली, १०० चौरस फूट खोलीत राहत आहेत. १ मार्च रोजी प्रोफेसर दितुरी यांनी त्यांचा अनोखा प्रवास सुरू केला आणि या संबंधित एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर केला.
प्रोजेक्ट नेपच्यून नावाच्या संशोधनाचा एक भाग म्हणून फ्लोरिडामधील एका मोठ्या तलावामध्ये ते राहू लागले. प्रोजेक्ट नेपच्यूनचा उद्देश सागरी संवर्धनाविषयी जागरुकता वाढवण्याबरोबरच तिथे मानवांमधील शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास करणे हा आहे.
फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाने हा अनोखा प्रकार करून नवा विक्रम केला आहे. अमेरिकेचे प्राध्यापक जोसेफ दितुरी यांनी सर्वात जास्त काळ पाण्याखाली राहण्याचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम केला आहे. अनोख्या जैविक अभ्यासासाठी पाण्याखाली राहणाऱ्या जोसेफने १०० दिवस तिथे राहायचे ठरवले आहे. याआधी २०१४ मध्ये आणखी दोन प्राध्यापकांनी पाण्याखाली ७३ दिवस राहण्याचा विक्रम केला होता.
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये दितुरी यांनी लिहिले की, ‘आज रेकॉर्ड ब्रेकिंग दिवस आहे, ७३ दिवस पाण्याखाली घालवल्यानंतर मला आनंद आहे की माझी उत्सुकता मला इथपर्यंत घेऊन आली आहे. पाण्याखाली प्रतिकूल परिस्थितीत मानवी शरीर कसे कार्य करते यावर संशोधनात गुंतलेल्या केवळ येणाऱ्या पिढीलाच नव्हे तर शास्त्रज्ञांनाही प्रेरणा देणे हेच माझे ध्येय राहिले आहे. जागतिक विक्रम मोडणे ही एक रोमांचक गोष्ट आहे पण माझा प्रवास इथेच थांबणार नाही तर हा प्रवास अजून २३ दिवस सर्व वयोगटातील लोकांसाठी चालू राहील’.
न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर