नाशिक, २३ मे २०२३: दोन हजाराची नोट चलनातून बंद होणार असल्याने भविष्यात ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. एकंदरितच परिस्थिती पाहता नाशिकच्या नोट प्रेसमधील १.५०० कामगारांना पुढील चार महिने २४ तास कामकाज करावे लागणार आहे. २०१८-१९ मध्येच दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे आता पाचशेच्या नोटांची अधिक गरज भासणार आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोट प्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास २ हजार ८०० दशलक्ष नोटांची छपाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला ५०० रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिलपासून आतापर्यंत ३० कोटी नोटांची छपाईही झाली. आता दोन हजारांची एक नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या ४ नोटा लागणार असल्याने ५०० च्या नोटांची मागणी वाढणार आहे.
सध्या दोन हजारांच्या अंदाजे १ हजार ८३३ दशलक्ष नोटा बाजारात आहेत आणि हे बघता पाचशेच्या जवळपास ७.५०० दशलक्ष नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये या नोटा तयार केल्या जाणार असून, येत्या चार महिन्यांत २ हजार ८०० दशलक्ष नोटांची छपाई एकट्या नाशिक प्रेसमध्ये होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर