मुंबई, २६ मे २०२३: नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात ना, असाच प्रकार मुंबईतील धारावी येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीसोबत घडला आहे. ज्या मुलीला घरच्यांशिवाय कुणी विचारलंही नव्हतं, त्या मुलीची आज देशात आणि जगात सगळीकडे चर्चा होत आहे. या मुलीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मलिशा खारवा असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहते. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या मलिशाला जगातील सर्वात मोठ्या ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियलने ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. मलिशा आता फॉरेस्ट एसेंशियलच्या “द युवती” कलेक्शनचा चेहरा आहे. मलिशाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फॉरेस्ट एसेंशियल स्टोअरमध्ये पोहोचते आणि तिथल्या बॅनरवर तिचे छायाचित्र पाहून खुश होते. हा व्हिडिओ फॉरेस्ट एसेन्शियल्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
२०२० मध्ये जेव्हा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन झोपडपट्टीतील काही मुलांसोबत त्याच्या एका म्युझिक व्हिडिओसाठी काम करण्यासाठी आला तेव्हा मलिशाचे आयुष्य बदलले. रॉबर्टला त्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना कास्ट करायचे होते. यादरम्यान रॉबर्टच्या व्हिडिओमध्ये मलिशाला संधी मिळाली नाही. पण नंतर मलिशाने रॉबर्टला तिच्या आत्मविश्वासाने आणि आकर्षकतेने प्रभावित केले. यानंतर रॉबर्टने स्वतः मलिशाची भेट घेतली आणि तिला तिच्या स्वप्नांबद्दल विचारले. मलिशाने सांगितले की, तिला मॉडेल बनायचे आहे. त्यानंतर रॉबर्टने मलिशासाठी क्राऊड फंडिंग खाते तयार केले. याद्वारे आतापर्यंत एकूण ११ लाख रुपये जमा झाले आहेत. मलिशाने अनेक मॉडेलिंग इव्हेंटमध्येही भाग घेतला आहे. सध्या ती तिच्या अभ्यासासोबतच मॉडेलिंगवरही लक्ष देत आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर