वन्यप्राणी- सायाळ/साळींदर (Indian porcupine)

भारतात सायाळ सर्वत्र आढळतात. ते कोणत्याही हवामानात राहू शकतात. सायाळ, साळिंदर, साळू आणि इंग्रजीत Porcupine या नावाने भारतात त्याला ओळखले जाते. पश्चिम हिमालयात समुद्रसपाटीपासून अडीच हजार मीटर उंचीपर्यंत सायाळ आढळतात. सायाळ ही मध्यपूर्व ते दक्षिण आशियात सर्वत्र आढळते. उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वनांच्या पोकळ, खडकाळ प्रदेशांत तसेच पानगळीच्या जंगलात, कमी उंचीच्या जंगलात, शेतात हा प्राणी जमिनीत बिळे करून राहतो.

पूर्ण वाढलेल्या सायाळची लांबी तीन फुटापर्यंत तर शेपूट ८-९ सेंमी लांब असते. वजन अठरा किलो पर्यंत भरते. सायाळीच्या कातडीचा रंग मुख्यत्वे काळा असून, पाठीकडून मागच्या बाजूला असलेले केस विशेष पद्धतीने विकसित झाले आहेत. संपूर्ण शरीर या काटेरी केसांनी आच्छादिलेले असते. हे केस कडक असल्याने ते काट्यासारखे टोकदार होतात. हे ‘काटे’ पांढऱ्या तपकिरी रंगाचे आणि पूर्णपणे पोकळ असतात. पाठीवरील असे केस ३० सें.मी. पर्यंत लांब असतात.भारतीय सायाळ च शास्त्रीय नाव हिस्ट्रिक्स इंडिका आहे.

सायाळ दिवसभर जमिनीत स्वत: खोदलेल्या बिळांमध्ये अथवा खडकांच्या कपारीमध्ये राहतात. बिळे खोदून झाल्यावर बिळांच्या तोंडाजवळ त्या खूप माती आणून टाकतात, तसेच प्राण्यांच्या हाडाचे तुकडे व हरणांची शिंगे ठेवतात. सायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे सहजपणे फोडून खातात. सायाळ आपल्या अंगावरील काट्यांची व्यवस्थित वाढ व्हावी यासाठी हाडे व इतर पदार्थातून कॅल्शियम मिळवितात. त्यांची बिळे विशिष्ट पद्घतीने खोदलेली असतात. बिळास मुख्य तोंडाखेरीज वेळप्रसंगी झटकन बाहेर पडता यावे म्हणून दोन-तीन तोंडे असतात. बिळे तोंडापासून खूप खोलपर्यंत खोदलेली असतात आणि आतमध्ये ती खूप मोठी व प्रशस्त असतात.

सायाळ संध्याकाळी वा रात्री बिळातून बाहेर पडतात. त्यांचे गंधज्ञान अतिशय तीव्र असते. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे अन्न आहे. यामुळे त्या बागायती पिके व शेतीचे फार नुकसान करतात. त्यांना धोक्याची सूचना मिळाली की, त्या आपले शरीर फुगवून अंगावरील काट्यांची सळसळ करुन काटे ताठ उभे करतात. त्या शत्रूवर हल्ला करण्याच्या वेळी आपली पाठ शत्रूकडे करतात व पाठीमागे जाऊन जोरात आपले तीक्ष्ण काटे शत्रूवर रोखतात. कित्येक वेळा सायाळ च्या काट्यांनी वाघ व बिबटे जखमी झाल्याची आणि त्याच्या रुतलेल्या काट्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. हे काटे शत्रूच्या शरीरात घुसल्यावर फक्त त्यांची टोके मोडतात व ती शरीरात अडकून राहतात. काटे सायाळीच्या शरीरापासून अलग झाल्यास नवीन काटे येतात. साळीच्या मागच्या पायांवर व कमरेखाली पण सफेद रंगाचे काटे असतात. त्या एकेकट्या निर्धास्तपणे भटकत असतात.

साधारणपणे मार्च महिन्यात सायाळना पिले होतात. गर्भावधी दोन महिन्यांचा असतो. एकावेळी दोन ते चार पिले जन्मास येतात. नर-मादी दोघेही बिळामध्ये पिलांची काळजी घेतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडे असतात. त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात. पिले मोठी होईपर्यंत पालकांसोबत राहतात. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.

भारतात हिस्ट्रिक्स इंडिका या जातीशिवाय सायाळच्या आणखी दोन जाती आढळतात. त्यापैकी हॉगसन्स पॉर्क्युपाइन सायाळ मध्य व पूर्व हिमालय, आसाम, प. बंगाल या ठिकाणी आढळतात. या सायाळींचा डोक्याचा भाग १५ सेंमी. पेक्षा लहान असतो. दुसरी ब्रशटेल्ड पॉर्क्युपाइन सायाळ ही जात भारतात प. बंगाल व आसाममध्ये तसेच मलेशिया या देशात आढळतात. त्यांची शेपटी लांब असून तिच्यावर ब्रशसारखे दाट केस असतात. त्यांच्या सवयींबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा