आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव उतरले, पण पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थेच !

नवी दिल्ली : जागतिक बाजार पेठेत कच्च्या तेलाचे भाव एका वर्षात कधीच १३९ डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले नाही. या भावाने मध्यंतरी ९० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा गाठला असला तरी अल्पावधीतच कच्च्या तेलात घसरण झाली. कंपन्यांचा उरलासुरला सर्व तोटा, नुकसान भरुन निघाले आहे. या कंपन्यांनी मार्च महिन्याच्या तिमाहीत जोरदार कमाई केली आहे. भारतीय तेल उत्पादक आणि विपणन कंपन्या रशियाकडून स्वस्तात इंधन घेऊन त्याची युरोपातील राष्ट्रांमध्ये विक्री करत आहेत. त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. कच्चे तेल गेल्या अनेक महिन्यांपासून स्वस्त असले तरी त्याचा कवडीभरही फायदा देशातील नागरिकांना मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आवाक्यात आल्या नाहीत. कच्च्या तेलाचे भाव वधारले की ताबडतोब दरवाढ करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाने जबरदस्त उसळी घेतली होती. कच्चे तेल १३९ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. २००८ नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जानेवारी २०२३ मध्ये किंमती ८० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. नंतर त्यात घसरण झाली. जून २०१७ पूर्वी इंधनाच्या किंमती दर १५ दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज भावात बदल होतो.

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या १३ महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. २२ मे २०२२ रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची शक्यता आहे.

आज कच्च्या तेलात घसरण झाली. ९ जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल ७५.७२ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल ७०.९७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव हे गेल्या १५ महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरत आहेत. परंतु बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव मात्र जैसे थेच असलेले पाहायला मिळत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा