मुंबई १३ जून २०२३: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात, मुंबई न्यायालयात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. २०२२ पासून सोमय्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आपल्याविरोधात बदनामीकारक ट्विट करत असल्याचे राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे.
राऊत म्हणाले की, जेंव्हा मी सोमय्या यांच्या ट्विटर अकाऊंटवर माझ्या विरोधातील बदनामीकारक वक्तव्य पाहिले, तेंव्हा मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले. कोणताही ठोस पुरावा नसताना सोमय्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्याविरुद्ध केलेली बदनामीकारक विधाने हि समाजाच्या आणि सर्वसामान्यांच्या नजरेत माझी प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोणताही पुरावा नसताना ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या माझी बदनामी करत आहेत, असे राऊत यांनी स्पष्टपणे नमुद केले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९,५०० अन्वये तक्रारीची दखल घेऊन, सोमय्या यांना संशयित आरोपी म्हणून समन्स बजावण्याची विनंती राऊत यांनी मुलुंड, मुंबई येथील दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर