धुळे १४ जून २०२३ : महिला आरक्षणामुळे महिलांना राजकारणामध्ये संधी मिळू लागली आणि आता धुळे महानगरपालिकेमध्ये महिला राज आले आहे. महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी महिलांची निवड करण्यात आली. त्याच बरोबर या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या देखील महिलाच आहेत. त्यामुळे राज्यात बहुधा महिलाराज असलेली पहिली एकमेव महापालिका, धुळे महापालिका ठरली आहे.
विद्यमान महापौरपदी प्रतिभा चौधरी या कार्यरत असून आता उपमहापौरपदी वैशाली वराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नागसेन बोरसे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी वैशाली वराडे या उपमहापौर झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपने महानगरपालिकेचा कारभार महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता धुळे महानगरपालिकेमध्ये संपूर्णपणे महिलाराज सक्रिय झाले असे म्हणायला हरकत नाही.
या महानगरपालिकेत महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर पदी वैशाली वराडे, स्थायी समिती सभापतीपदी किरण कुलेवार, महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका अग्रवाल, सभागृह नेते पदी भारती माळी यांची निवड भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून, राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका कल्पना महाले या विरोधी पक्षनेत्या आहेत. त्यामुळे एकूणच या महापालिकेत महिलांचं राज्य आलय.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर