‘विमल चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वसंतदादा पाटील प्रतिष्ठान’ तर्फे, वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार आणि फराळाची सोय

सासवड, पुणे १५ जून २०२३: पुण्यातील सासवड येथे दरवर्षी प्रमाणे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी आहे. वारीच्या या भक्तिमय वातावरणात, असंख्य वारकरी वेगवेगळ्या संतांच्या पालखी सोबत, शेकडो किलोमीटर चालत पंढरपूर कडे जातात. पंढरपुरात जाऊन आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतल्यावरच या वारकऱ्यांची वारी संपते. वारीत सर्व वयोगटातील लोक असतात.

मनाने कितीही आनंदी उत्साहित असले तरी, वारीतील भाविक वारकऱ्यांना या काळात शारीरिक समस्या जाणवतात. पालख्या गावोगावी जात असल्याने, वातावरणात सतत बदल होतो. त्यामुळे भाविक वारकरी आजारी पडतात. वयोवृद्ध हे चालण्याच्या अतिश्रमाने थकून जातात. छोट्या मोठ्या जखमा होत असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सासवड येथे ‘विमल चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वसंतदादा पाटील प्रतिष्ठान’ तर्फे, वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार आणि फराळाची सोय, कॅम्प द्वारे करण्यात आली आहे.

विमल चॅरिटेबल ट्रस्ट(विमल सुपर-स्पेशालिटी क्लिनिक, उंड्री, पुणे) चे डॉ. चंद्रशेखर अहिरे, डॉ. मनोज अहिरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आबालवृद्ध वारकरी वेगवेगळी दुखणी घेऊन कॅम्पमध्ये येतात. कुणाला डोळ्याचा त्रास होत असतो तर कोणी सर्दी-पडसे-तापाने आजारी असतो. काहींना छोट्या मोठ्या जखमा झाल्या असतात तर काहींना थकवा जाणवतो. अशा अनेक समस्यांवर आम्ही त्यांच्याशी बोलतो व त्यांना ट्रीटमेंट देतो.

डॉ. अहिरे आपले सहकारी डॉ. नीरज नागर, डॉ. संकेत लोलगे, डॉ. जयेश कटके यांच्यासोबत वारकऱ्यांवर ट्रीटमेंट करत पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही डोळ्यांच्या समस्या असणाऱ्यांना आय ड्रॉप तसेच प्रसंगी चष्मे सुद्धा देतो. ब्लडप्रेशर चेक करणे, आजारपणानुसार गोळ्या-औषधे-मलम मोफत देणे, जखमेवर ड्रेसिंग करणे, आवळपट्टी बांधून देणे, रक्तवाढीच्या गोळ्या देणे, थकवा जाऊन एनर्जी येण्यासाठी ORS सारखी पावडर देणे, प्रसंगी लगेच आराम पडावा यासाठी इंजेक्शन लावणे इत्यादी उपचार आणि समुपदेशनही आम्ही या कॅम्प मध्ये करतो. सोबत या कॅम्पचे आयोजक, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान चे श्री.जालिंदर कामठे आणि त्यांचे मित्र स्वयंसेवक वारकऱ्यांना फराळ देऊन त्यांची आपुलकीने चौकीशी करतात.

डॉ.अहिरे यांच्या कार्याबद्दल वारकऱ्यांनी खूपच समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या. वारीच्या पुढील प्रवासात नक्कीच त्यांना विमल चॅरिटेबल ट्रस्टनी दिलेल्या औषध गोळ्यांचा आणि ट्रीटमेंटचा फायदा होऊन, लाडक्या विठुरायाचे विनासायास दर्शन होईल, अशी माहिती काही वारकऱ्यांनी यावेळी दिली. या कार्यासाठी डॉ.अहिरे आणि त्यांच्या टीम ला वारकाऱ्यांकडून भरभरून आशीर्वादाची शिदोरी मिळाली. दरवर्षी अशाच कॅम्प द्वारे वारकाऱ्यांची सेवा आमच्याकडून घडत राहो ही कामना विठुरायाच्या चरणी करतो, असे या प्रसंगी सगळ्या डॉक्टरांच्या टीमकडून, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कडून आणि स्वयंसेवी व्यक्तींकडून सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा